Aamhi Sare Foundation 2.86

Aamhi Sare, Aakansha Tower, TIrupati Nagar
444606

About Aamhi Sare Foundation

Aamhi Sare Foundation Aamhi Sare Foundation is a well known place listed as Non-profit Organization in -NA- ,

Contact Details & Working Hours

Details

आम्ही सारे - अगदी योगायोगाने तयार झालेलं हे संघटन आहे. आजच्या Tagline च्या भाषेत एका वाक्यात 'आम्ही सारे' बद्दल सांगायचं झाल्यास 'साफ दिल, खुला दिमाग' असलेली ही संघटना आहे . समता , स्वातंत्र्य आणि विवेकवादावर विश्वास असलेल्या सर्किट मंडळींचा हा गोतावळा आहे . काही एक ठरवून , काही उद्देश वा मिशन ठेवून स्थापन झालेली ही संघटना नाही . वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना संवेदनशील माणसांना पडणाऱ्या अनेकविध प्रश्नांची उत्तर मिळविण्याची धडपड करतानाच एकमेकांच्या साथीने समृद्ध व्हायचा 'आम्ही सारे' चा प्रयत्न आहे . गमतीने खूप सारे प्रश्न पडणाऱ्या माणसांची संघटना म्हणजे 'आम्ही सारे ' असे आम्ही सांगत असतो . या संघटनेची निर्मितीची कहाणी जरा हटके आणि वेगळी आहे . पाच वर्षापूर्वी ऑक्टोबर २०११ मध्ये विदर्भातील नामवंत शेतकरी आंदोलक , सामाजिक कार्यकर्ते आणि ' एका साध्या सत्यासाठी ' आणि 'आपुलाची वाद आपणाशी ' या गाजलेल्या पुस्तकांचे लेखक चंद्रकांत वानखडे यांच्या एकसष्टीनिमित्य त्यांच्यावर प्रेम करणा-या विदर्भातील काही कार्यकर्त्यांनी त्यांना ११ लाख रुपयांचा कृतज्ञता निधी देण्याचे ठरविले. आयुष्यभर समाजासाठी काम करणाऱ्या या मनस्वी कार्यकर्त्याला आयुष्याच्या संध्याकाळी पोटासाठी वणवण करायचं काम पडू नये , ही भावना त्यामागे होती . त्यासाठी विदर्भातील ११ जिल्ह्यातून प्रत्येकी १ लाख रुपयांचा निधी जमवायचे ठरविले. एका जिल्ह्यातून एका माणसाकडून प्रत्येकी १,००० हजार रुपये… या पद्धतीने एका जिल्ह्यातील फक्त १०० आणि विदर्भातील एकूण १,१०० माणसांकडून हा निधी जमा करण्याचे नियोजन केले होते. अट एकाच होती ज्यांना चंद्रकांत वानखडे यांचं काम माहीत आहे आणि जे स्वेच्छेने १,००० रुपये देतील अशा चंद्रकांत वानखडे आणि त्यांच्या कामावर प्रेम करणा -या लोकांकडूनच हा निधी जमा करावयाचा . विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून या कल्पनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला . १५ ऑक्टोबर २०११ ला अमरावतीत एका जाहीर कार्यक्रमात प्रतिकात्मक स्वरुपात वानखडे यांना हा ११ लाखाचा निधी देण्यात आला . त्यानंतर लगेचच बँकेच्या औपचारिकता पूर्ण करून प्रत्यक्ष स्वरुपात ११ लाख रुपयांचा धनादेश चंद्रकांत वानखडे यांना द्यावयास कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले. मात्र त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला . 'मी तुमच्या भावनांचा आदर करतो . मात्र हा निधी मी स्वीकारणार नाही', असे सांगत त्यांनी आपली भूमिका सर्वांसमोर मांडली . ' मी मेटीखेडा या गावी शेतकरी -शेतमजुरांसाठी काम करत असतांना अनेकदा मला पैशांची आवश्यकता भासायची . मात्र ते दिवस आता मागे पडलेत . आता लिखाण आणि व्याख्यानातून माझ्या आणि पत्नी मायाच्या गरजेपुरतं मला मिळतं. त्यामुळे आता या पैशाची खरंच गरज नाही ', असे त्यांनी विनम्रपणे सांगितले. या वेळी बोलतांना त्यांनी दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. 'गेल्या काही वर्षात आत्मकथनामुळे माझ्यावर पुरस्कारांचा वर्षाव होतो आहे. कौतुक होत आहे , मात्र हे पुरस्कार, कौतुक, सन्मान माझ्यातील लेखकाचा होतो आहे. कार्यकर्त्याचा नाही. कार्यकर्ता कायम उपेक्षितच असतो. मला लिहीता येतं, बोलता येतं . त्यामुळे माझा प्रवास, आयुष्यातील संघर्ष मी लिहू शकलो, जाहीरपणे मांडू शकलो . त्यामुळे ठिकठिकाणी माझे कौतुकसोहळे सुरु झालेत.. मात्र माझ्यापेक्षाही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आयुष्य झोकून देवून काम करणारे कार्यकर्ते आहेत. ते कोणाला माहितही नाहीत. त्यांना स्वतः ची कहाणी सांगताही येत नाही आणि लिहिताही येत नाही. मात्र त्यांचा जीवन संघर्ष माझ्यापेक्षा मोठा आहे . मला ११ लाखाचा जो कृतज्ञता निधी आपण दिला त्याच्या व्याजातून अशा कुठल्याही क्षेत्रात निष्ठेने , तळमळीने काम करणा -या आणि आयुष्य झोकून देणाऱ्या कार्यकर्त्याला दरवर्षी १ लाखाचा पुरस्कार देण्यात यावा.' चंद्रकांत वानखडे यांच्या या मनोगतानंतर सारेच नि:शब्द झाले.. त्यांची भावना सा-यांनाच स्पर्शून गेली. सर्वांचे युक्तिवाद गोठून गेलेत. अखेर त्यांच्या इच्छेचा आदर म्हणून सामूहिक विचारविनिमयातून ११ लाखाच्या निधीवर मिळणा -या व्याजातून दरवर्षी १ लाख रुपयांचा 'कार्यकर्ता पुरस्कार' देण्याचं निश्चित झालं . त्यावेळी दरवर्षी नियमित स्वरुपात हा कार्यक्रम घेण्यासाठी एक संघटना हवी असा विचार पुढे आला. हाच 'आम्ही सारे ' चा जन्म होता. (चंद्रकांत वानखडेंना जाहीर कार्यक्रमात ११ लाखाचा प्रतिकात्मक असा जो धनादेश आम्ही दिला होता , त्यावर सर्वांनी मिळून पैसे जमा केलेत म्हणून 'आम्ही सारे' अशी सही केली होती . त्यामुळे संघटनेसाठी हेच नाव योग्य राहील असे एकाने सुचविले. ते सर्वांनाच आवडले.) चंदूभाऊंसाठी ११ लाखांचा कृतज्ञता निधी जमा करतांना विदर्भातील जवळपास चाळीसेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. ते सारे आपसूक 'आम्ही सारे' चे संस्थापक सदस्य झालेत . ('आम्ही सारे' चा पहिला १ लाखाचा 'कार्यकर्ता पुरस्कार' शेतकरी आंदोलनात अनेक वर्षापासून काम करणारे विजय विल्हेकर यांना, तर २०१३ चा पुरस्कार मराठवाडयातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक अमर हबीब यांना देण्यात आलाय . २०१४ चा पुरस्कार गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांच्या प्रबोधनकारी कीर्तन परंपरेचा वारसा चालविणारे सत्यपाल महाराज यांना मिळाला . २०१५ च्या पुरस्कारासाठी शेतकरी आंदोलक गजानन अमदाबादकर यांची निवड झाली आहे .)
'आम्ही सारे' ची निर्मिती ही अशी झाली. आम्ही सारे साठी काम करणारी बहुतांश मंडळी बिलकुल 'सर्किट' आहे . यात वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं आहेत. आपापली नोकरी, व्यवसाय, संस्था सांभाळून काहीतरी वेगळं करण्यासाठी धडपडणारी ही टीम आहे. यात सहभागी होण्यासाठी कुठलेही नियम, अटी, प्रवेश शुल्क नाही. जे समाजाप्रती आपली बांधिलकी मानतात . आपला व्यवसाय, नोकरी किंवा उदरनिर्वाहासाठी जे काही करतात ते प्रामाणिकपणे , निष्ठेने करून आपण थोडंफार काहीतरी या समाजाचं देणं लागतो , अस मानणा-या कुठल्याही व्यक्तीचं 'आम्ही सारे' त स्वागत आहे. हे संघटन , ही चळवळ एकमेकांना समृद्ध करणारी चळवळ आहे. यात 'मी ' म्हणून असा एक कोणी नाही , तर सारे 'आम्ही' आहोत. 'आम्ही सारे' त कुठलाही एक विचार नाही. .इझम नाही .प्रतीक नाही . कुठलाही अभिनिवेशला येथे जागा नाही . आपापले सारे आग्रह , बांधिलकी बाजूला ठेवून मोकळ्या मनाने येथे यावयाचं आहे . मात्र सर्व परिवर्तनवादी विचारांचं येथे स्वागत असणार आहे. समता , स्वातंत्र्य आणि विवेकवादावर 'आम्ही सारे' चा विश्वास आहे .
गेल्या पाच वर्षात प्रा . सदानंद मोरे , प्रा . दत्ता भगत , डॉ . आ . ह. साळुंखे , शेषराव मोरे , अच्युत गोडबोले , आनंद घैसास , चंद्रकांत वानखडे, कॉ . गोविंद पानसरे, राजन खान अशा अनेक मान्यवरांची भाषण , ट्रान्सजेन्डरसाठी काम करणा -या लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची प्रकट मुलाखत , सचिन परब व श्रीरंग गायकवाड संपादित संत नामदेव यांच्यावरील 'महानामा' या पुस्तकावर चर्चासत्र , खगोल कार्यशाळा , ग्रंथ महोत्सव अशा अनेक वेधक कार्यक्रमांचे आयोजन विदर्भाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात 'आम्ही सारे' ने केले आहे . याशिवाय अनेक सामाजिक उपक्रमात 'आम्ही सारे' अग्रेसर असते . अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना आम्ही सारेतर्फे आर्थिक मदतही केली आहे . २०१४ मध्ये नामवंत लेखिका कविता महाजन , राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक सतीश मनवर , ४५ वर्षापासून अविरत वैद्यकीय सेवा करणारे अमरावतीचे डॉ . गणेश बूब , सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्यायपालिकेच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारे नागपूरचे विधिज्ञ अनिल किलोर , आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात भरीव काम करणारे चंद्रपूरचे प्रवीण मोते यांना 'आम्ही सारे' प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले होते . लौकिक मोठेपणाच्या नादी न लागता समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात मेहनतीने , निष्ठेने , प्रामाणिकपणे काम करणा-या माणसांना हा पुरस्कार दिला जातो … २०१५ पासून 'गांधी समजून घेताना … ' आणि 'कार्यकर्ता शिबीर' अशी दोन नियमित शिबीर दरवर्षी आम्ही सारे आयोजित करते आहे . कार्यकर्ता शिबिरात बदलते जग कसे समजून घ्यायचे काय वाचायला हवं , विचार कसा केला पाहिजे , महापुरुषांना कसं समजून घ्यायचे अशा अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा केल्या जातात . नोव्हेंबर २०१५मध्ये पणजी (गोवा) येथे आयोजित कार्यकर्ता शिबिरात दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ आ. ह . साळुंखे , संजय आवटे , विष्णू सूर्या वाघ , संजय सोनवणी , कलानंद मनी , अमर हबीब , राजाभाऊ शिरगुप्पे , चंद्रकांत वानखडे आदी मान्यवर शिबिराला मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते .गांधी समजून घेताना … ' हे पहिले शिबीर गेल्यावर्षी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामला 'गांधींच्या कर्मभूमीत बापू कुटी परिसरात आयोजित केले होते . गांधीजींचे पणतू तुषार गांधी , नामवंत साहित्यिक सुरेश द्वादशीवार , इतिहास संशोधक आणि लेखक प्रा . शेषराव मोरे , नाटककार प्रा . दत्ता भगत , सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे , गांधी अभ्यासक आशुतोष शेवाळकर आदी मान्यवरांनी गांधीजींच्या व्यक्तिमत्व आणि विचारांच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला . संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक या शिबिरासाठी आले होते .यावर्षी पुणे येथील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात हे शिबीर ३० व ३१ जानेवारीला आयोजित करण्यात आले होते . सदानंद मोरे , आनंद करंदीकर , अनिल अवचट , श्याम मानव , सुधाकर जाधव , विनोद शिरसाठ आदी मान्यवरांनी 'गांधी आणि बहुजनवाद' , 'गांधी आणि तंत्रज्ञान' , 'गांधींचे अर्थकारण' , 'मला उमगलेला गांधी', 'गांधी आणि आजचा तरुण' या विषयांवर आपली मते मांडलीत . शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून ८७ जणांनी हजेरी लावली . या शिबिरानंतर लगेचच महात्मा गांधी यांचे पणतू व 'लेट्स किल गांधी' या पुस्तकाचे लेखक तुषार गांधी यांची 'गांधी हत्येमागील षड्यंत्र ' या विषयावर विदर्भातील अकोला , बुलडाणा , अमरावती आणि नागपूर येथे जाहीर व्याख्याने झालीत . संपूर्ण महाराष्ट्रात ही भाषणे गाजत आहेत . गांधी हत्येमागील जी कारणे वर्षानुवर्ष लपविली जात आहेत . त्यावर या व्याख्यानांनी प्रकाश पडला . 'आम्ही सारे' त आज शेतकरी संघटना , गांधीवादी , समाजवादी, कम्युनिस्ट, कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा, आंबेडकरवादी , सावरकरवादी ,सर्वोदयी ,मराठा सेवा संघ , संभाजी बिग्रेड , अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ , रयत अशा वेगवेगळ्या विचारांची मंडळी आहेत. वेगवेगळ्या चळवळी आणि आंदोलनातील चांगले -वाईट अनुभव सर्वांच्या गाठीशी आहेत. आपण सर्किट असाल तर आपलंही स्वागत आहे. 'आम्ही सारे' च्या माध्यमातून क्रांती वा व्यापक समाज परिवर्तन अशा गोष्टी आम्ही करत नाही. एकमेकांना समृद्ध करणं , एकमेकांना मोठं करणं, भावनांचा निचरा करण्याची एक जागा उपलब्ध करून देणं आणि आपल्या आजूबाजूचा अंधार आपल्यापरीने शक्य तितका दूर करण्याचा प्रयत्न तेवढं 'आम्ही सारे' करणार आहेत.ज्याला जेवढं पेलते तेवढं करायचं, एवढं सोपं सारं आहे. हे करताना आपल्या नेहमीच्या रूटीनमधून अधूनमधून वेळ काढून आनंदाचे , समाधानाचे क्षण टिपायचेत. नवीन उर्जा मिळवायची . आपणही या आनंदयात्रेत सहभागी होण्यास इच्छुक असाल तर या प्रवासात आपलंही स्वागत आहे.
आमच्यापैकी कुठल्याही सर्किटला भेटा किंवा फोन करा आणि या आनंदयात्रेत सहभागी व्हा.
'आम्ही सारे' बद्दल अधिक माहिती Facebook वर Aamhi sare foundation या page ला भेट देवून मिळविता येईल . आम्ही सारे चा Email Id - aamhisarefoundation@gmail .com असा आहे . आपण ८८८८७४४७९६, ९४२२१५७४२७, ९४२२१६१८७८ या क्रमांकावर संपर्क करूनही माहिती मिळवू शकता